धडाडीची भरारी!

धडाडीची भरारी!

धडाडीची भरारी!
फोटो शेअर करा
उत्तराखंडमधील वैमानिकांचे मदतकार्य पाहिल्यानंतर स्क्वाड्रन लीडर शिवानी यांच्यातील हवाई दल अधिकारी जागा होतो आणि कारगिल , त्सुनामी , प्रलय अशा काळात २७ टनांच्या एएन ३२ विमानाचे केलेले सारथ्य त्यांना आठवू लागते. फ्लाइंगमध्येच करिअर करण्याची महत्त्वाकांक्षा लहानपणापासूनच बाळगलेल्या शिवानी कुलकर्णी आज खासगी कंपनीत बिझनेस जेटचे सारथ्य करतात. मात्र एनसीसीची एअरविंग तसेच हवाई दलात केलेली कामगिरी त्यांची सतत सोबत करीत असते… कुटुंबावर झालेल्या आघातातून उभे राहण्याची प्रेरणा देत असते.
…..’ हवेत जसा जुनून (वेडेपणा) असतो , तसाच तुम्ही वैमानिक बनल्यावरही तुमच्यात संचारतो आणि मग त्यावर स्वार होत तुम्ही कितीही कठीण हवामान असले , अनोळखी प्रदेश असला , तरी या वेड्या साहसाला प्रशिक्षणाची जोड देत परोपकारी कामे करीत जाता… भीतीचा लवलेशही नसतो त्यावेळी… एखादी बचावमोहीम असो वा लष्करी मोहीम , वैमानिकाला मिळणारे समाधान आगळेच असते ‘, हे सांगणे स्क्वाड्रन लीडर शिवानी कुलकर्णी यांचे. हवाई दलापासून आता खासगी कंपनीत बिझनेस जेट उडविण्यापर्यंतची त्यांची भरारी थक्क करणारी अशीच.

नागपूरमध्ये जन्मलेल्या शिवानी या जबलपूरमध्ये प्राथमिक शालेय शिक्षण करून आठवीच्या टप्प्यावर नागपूरमध्ये आल्या,तेव्हापासूनच त्यांना फ्लाइंगच्या करिअरने भुरळ घातली. वडील बँकेत व आई गृहिणी,तेव्हा सैन्यदलांमधील करिअरशी फारशी ओळख नव्हतीच व वैमानिक प्रशिक्षणाइतका पैसाही नव्हता. दिवंगत कॅप्टन सीव्ही चाफेकर आणि कर्नल देशपांडे यांच्या सेवाभावी मार्गदर्शनातून त्यांनी सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या परीक्षेसाठी तयारी सुरू केली. एनसीसीच्या एअरविंगचे धडे उपयोगी पडत होतेच. बेस्ट कॅडेटची प्रशस्तीही मिळाली होती. १९९७ मध्ये वाराणसीमध्ये एसएसबीचा टप्पा तसेच वैमानिकासाठी आवश्यक असलेली पायलट अॅप्टिट्यूड बॅटरी टेस्ट एकाच फटक्यात पार करणे,ही गोष्ट त्यांच्यासाठी खूप मोलाची ठरली. त्यावेळी फ्लाइंग ब्रॅन्चमध्ये निवड झालेली विदर्भातील ती पहिली मुलगी ठरली. तिथून मग हैदराबादच्या डुंडीगल येथील एअरफोर्स अकादमीत शिवानी यांचे खडतर प्रशिक्षण सुरू झाले. एचपीटी ३२ या विमानावरील पहिला सहा महिन्यांचा टप्पा वैमानिक होण्यासाठी निर्णायक होता. पुढचे सहा महिने सूर्यकिरण विमाने आणि त्यानंतर एएन ३२ ट्रान्सपोर्ट विमानांवर त्यांचे प्रशिक्षण झाले. डिसेंबर १९९८मध्ये फ्लाइंग ऑफिसर म्हणून त्यांचे हवाई दलात कमिशनिंग झाले. कमिशनिंगच्या संचलनात`निशान टोली’मध्ये हवाई दलाचा उंच ध्वज घेऊन जाण्याचा मान कमावणारी उंचच उंच शिवानी पहिली महिला अधिकारी ठरली.

आसामच्या जोरहटमध्ये त्यांचे पहिले पोस्टिंग झाले. सुरुवातीच्याच काळात भूजचा भूकंप व दरभंगा पुरातील बचावकार्य तसेच कारगिल युद्धामध्ये जवानांना रसद व युद्धसामग्री पुरविण्याच्या मोहिमांवर त्या तैनात झाल्या. आग्र्यातील पोस्टिंगमध्ये स्वातंत्र्यदिनी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करणारी पहिली महिला सैन्याधिकारी बनण्याचा मान त्यांना मिळाला. येलहांका येथील पोस्टिंगमध्ये त्सुनामीच्या मदतकार्यात त्या सहभागी झाल्या. या सर्व काळात मॅनेजमेन्ट क्षेत्रात असलेले पती मनीष आमटे यांची पदोपदी साथ त्यांना होती.

दहा वर्षांची व २००० तास उड्डाणाची हवाई दलातील अतुलनीय सेवा संपल्यावर त्यांनी वर्षभर ब्रेक घेतला. दरम्यान त्यांनी आयआयएम बेंगळुरूमधून मॅनेजमेन्ट केले. दोन मुली लहान होत्या. मात्र त्याचवेळी , तीन वर्षांपूर्वी पती मनीष यांचे दुचाकी अपघातात निधन झाले. लष्करी सेवेमुळेच या धक्क्यातून कुटुंबाला सावरण्याचे धैर्य व प्रसंगावधान शिवानी यांना मिळाले , कारण तिसऱ्याच दिवशी इन्व्हिजन एअरमधून आलेल्या कॉलनुसार त्या बिझनेस जेटच्या उड्डाणासाठी सज्ज झाल्या. आता प्रवाशांचा कम्फर्ट लक्षात घेत कोणत्याही वेळी उड्डाण करणे हे त्यांचे नेहमीचे व सवयीचे काम झाले आहे. त्याचसोबत सुरू आहे ते मनीषच्या पालकांसह आपल्या कुटुंबाला सांभाळत भरारी घेण्याचे काम. त्यातही त्या यशस्वी होतील , यात शंका नाही.